लेखन प्रपंच !

  •  
  • राजगुरुनगरचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आपटे यांचा जीवनपट आपणा समोर मांडताना....

  • दि. १७ जुलै २०१२ रोजी बाळासाहेब आपटे यांना देवाज्ञा झाली. राज्यसभेतील खासदार म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत राहून तेथून निवृत्त झाल्याला जेमतेम दोन महिने झाले असतील तोच ही दु:खद बातमी देशभरातील त्यांच्याबरोबर काम केलेल्या अक्षरश: हजारो कार्यकर्त्यांना धक्का देणारी ठरली. जरी ताजा परिचय हा “भाजपा चे माजी खासदार” असा असला तरी प्रत्येकाच्या दृष्टीने, अगदी पक्षातील त्यांच्या सहकार्‍यांच्याही दृष्टीने, त्यांची ओळख “अ. भा. विद्यार्थी परिषदेचे बाळ आपटे” अशीच होती. १९६० च्या दशकात त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत अभाविपच्या कामाला सुरुवात केली आणि २००० च्या सुमारास राज्यसभेवर जाईपर्यंत म्हणजे सुमारे चाळीस वर्षे ते अभाविपच्या दैनंदिन कामाशी जोडले होते. अनेक वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागात अध्यापक म्हणून काम केले. ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ ह्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही ते सुमारे दोन दशके कार्यरत राहिले.

  •  
  • जे विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहे त्यांना बाळासाहेबांचे असे अनपेक्षितपणे जाणे चटका लावून गेले. घरातला एक कर्ता माणूस निघून गेल्याची जाणीव अ.भा.वि.प. च्या सर्व कार्यकर्त्यांना झाली असेल. गेली चार दशके बाळासाहेबांचे विद्यार्थी परिषदेशी असलेले अतुट नाते सर्वांनी अनुभवले. प्रखर देशभक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक, उदंड उद्यमशीलता असे कितीतरी पैलू, बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वात होते.

  •  
  • सतत चार दशके विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाची आणि त्यांच्यावर असलेल्या सामाजिक राष्ट्रीय जबाबदारीची वैचारिक मांडणी करीत असतानाच बदलत्या विद्यार्थी मानसाचे आणि दैशिक वैश्विक वास्तवाचे त्यांना भान होते. ह्या मांडणीला न्याय देणारी विद्यार्थी परिषद संघटनात्मक दृष्ट्याही बलशाही होईल यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. ते नुसते चिंतक नव्हते तर तरुणांच्या चळवळ प्रवणतेचे अचूक निदान त्याच्यापाशी होते. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या फळीला नवनवीन प्रयोग करु देण्याची उदारता आणि त्या प्रयोगांच्या यशस्विते साठी स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणूनच बाळासाहेबांची आठवण रहावी म्हणून त्यांचा एक वारसा पुढील पिढीला निरंतर मिळावा म्हणून त्यांचे जीवनचरित्र वेबसाईट रुपात जगाच्या कानाकोपर्‍यात जावे. त्याचे कार्य, त्यांचा आदर्श यांची सर्व जगताला ओळख व्हावी या हेतूने केलेला हा लेखन प्रपंच.

  •  
  • बाळासाहेबांचे चरित्र रेखाटताना स्वर्गीय परशुराम (दादासाहेब) आपटे (बाळासाहेबांचे वडील) यांचे जीवन प्रवासाचे सुद्धा विचार केला गेला आहे. बाळासाहेबांच्या जडणघडणीत दादासाहेबांचा प्रमुख सहभाग होता. तसेच त्यांचे निवासस्थान म्हणजेच पुण्याजवळील राजगुरुनगर येथील आपटे वाडा, याच्या ऐतिहासिक महत्वावर सुध्दा यात प्रकाश पाडला आहे. बाळासाहेबांचे जन्मगाव राजगुरुनगर हे हुतात्मा राजगुरुंचे सुद्धा जन्मगाव असल्या कारणाने हुतात्मा राजगुरुंचा उल्लेख सुद्धा प्रामुख्याने घ्यावा लागेल. म्हणूनच आपल्या विचारधारेवरील तसेच कार्यपध्दतीवरील कार्यकर्त्यांचा विश्वास टिकावा, तो आणखी दृढ व्हावा आणि वरपांगी भुलभुलैया मुळे संभ्रमित होऊन ते विचलीत होऊ नयेत यासाठी स्थिर चित्ताने ध्येयवादाचा पाठपुरावा करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानणार्‍या व्यक्तीमत्वांची उदाहरणे कार्यकर्त्यांसमोर ठळकपणे येण्याची नितांत गरज आहे. तद्वतच सार्वजनिक जीवन आणि ते जगणार्‍या व्यक्तीमत्वांबद्दलची आदरयुक्त भावना समाज मानसातही जागती ठेवून त्यांच्याविषयी निगडीत व्यक्ती व गोष्टींचा हा प्रपंच त्या प्रक्रियेला पूरक ठरेल आणि भावी पिढीला एक मार्गदर्शक म्हणून काम करेल असा विश्वास आहे.

  •  
  • आभार !

  • या लेखन प्रपंचासाठी (वेबसाईटसाठी) बर्‍याच मोलाच्या व्यक्तींचे विचार, त्यांच्या आठवणी, लेखन यांचा उपयोग झाला. प्रामुख्याने उल्लेख करावा असे परम मित्र पब्लिकेशन्स यांचे बाळ आपटे व्यक्तिवेध एका तत्वनिष्ठ, चतुरस्त्र कार्यकर्त्याचा याचे नाव घ्यावे लागेल. त्याबद्दल संपादक मंडळाचे आम्ही आभारी आहोत. बाळासाहेबांचे जवळचे आप्तेष्ट, मित्रवर्ग यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने व विचाराने ही वेबसाईट अधिकाधिक परिपूर्ण बनविण्याचा आम्ही मनपूर्वक प्रयत्न केला आहे. त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

  •