मनोगत – सुवर्ण महोत्सव स्मरणिका सन १९३१ – १९८१ !
१९२२ साली मी हायकोर्ट प्लीडर ही त्या वेळची प्रचलित असलेली परिक्षा पास झालो, तेव्हा मी मुंबईला पोष्टात तारमास्तरची नोकरी करत होतो. तेथे राजीनामा देऊन खेडला (आता ते राजगुरूनगर झाले आहे) वकिली करण्यासाठी आलो. खेडच्या त्या वेळच्या परिस्थितीत तीन गोष्टींचा आग्रह माझ्या मनात होता. आपल्या गावात एक माध्यमिक शाळा असावी, एक नागरी सहकारी बँक असावी व गावाला पाणीपुरवठ्याची योजना असावी. नंतरच्या काही वर्षात या दृष्टीने मी माझ्यापरीने प्रयत्न केला. आज सुमारे साठ वर्षानंतर मागे वळून पाहता या सर्व गोष्टी परमेश्वर कृपेने आणि गावकर्यांच्या सामूहिक प्रयत्नाने घडून आल्या याचे मनात अतीव समाधान आहे.
पन्नास वर्षापुर्वी आम्ही गावातल्या सर्व थरांतल्या मंडळींनी जमून को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली, तेव्हा बँकेचा सगळा संसार माझ्या कचेरीच्याच एका भागात असलेल्या एका कपाटात मावण्याइतका बंदिस्त, नेमस्त होता. हा व्याप वाढता वाढता आज बँकेची स्वत:ची तिमजली इमारत असूनही जागा पुरत नाही, दाटीवाटीने कामकाज चालवावे लागवे इतका तो वाढला आहे, हे पाहून मन भरून येते.
आज समाजाच्या सर्व थरांतून सुमारे दोन हजार सभासद बँकेच्या कामात सहभागी आहेत, चार लाखांचे भाग-भांडवल आहे. एक्याण्णव लाखाच्या ठेवी आहेत आणि साठ लाख इतका मोठा कर्जव्यवहार आहे. गावांतील सर्व प्रकारच्या गरजा करण्याच्या दृष्टीने कर्ज-वाटप होते. वीटभट्टी असेल, सॉमिल असेल अशा विविध प्रकारच्या उपक्रमांना बँक आज सहाय्य करते आहे. ही आकडेवारी व हा तपशील बोलका आहे. गावकर्यांची केवढी मोठी गरज भागवण्यात बँक यशस्वी होते आहे हे यावरून सहज ध्यानात येते.
बँकेची चाकणला शाखा निज्ञाली आहे. आणखी दोन-तीन शाखांच्या स्थापनेची पूर्वतयारी पूर्ण होत आहे. केवळ राजगुरूनगर गावातीलच नव्हे, तर संपुर्ण तालुक्यातील जनसामान्याला हा आधारवड उपयोगी पडण्याच्या स्थितीत आहे ही फारच समाधानाची गोष्ट आहे.
सभासदांनी व संचालक मंडळांनी बँकेला अव्यवस्था, अंदाधुंदी गटबाजी व मारामार्या यांपासून मुक्त ठेवले आहे. जनसेवेच्या निरोगी स्पर्धेमध्ये अहमहमिकेने भाग घेऊन पुढे येणार्या तरूण संचालकांनी प्रगतीचा मार्गच सतत प्रशस्त ठेवला आहे याचेही समाधान माझ्यासारख्या वृध्दला अधिक आहे. देश आज एक नव कृषि औद्योगिक क्रांतीच्या संधिकालातून जात आहे. या काळात सहकारी बँकेचे योगदान फार मोठे असू शकते. कृषि उद्योजकांना आवश्यक ते सर्व प्रोत्साहन देणे, उपक्रमशीलतेने स्वागत करणे आणि स्वत: बँकेच्या अधिकारी वर्गानेच कल्पनाशक्ती व उपक्रमशीलतेला चालना देण्यात पुढाकार घेणे यांतून परिवर्तनाचा, आर्थिक सुबत्तेचा मार्ग खुला होईल अशी आशा करायला जागा आहे.
बँकेची ही सर्व प्रगती व नवी आव्हाने स्वीकारण्याची वाढलेली क्षमता पाहण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी परमेश्वरचरणी कृतज्ञ आहे. नवीन काम करणार्या सर्व संचालकांना व बँकेच्या अधिकार्यांना समाजसावेची नित्य नवी प्रेरणा परमेश्वर देवो ही प्रार्थना. त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !
