बाळासाहेब आपटे - खासदार निधी

संसदीय क्षेत्रविकास निधी !

संसदेच्या सर्वच खासदारांना वार्षिक २ कोटी रुपये आपल्या संसदीय क्षेत्रात विविध विकासाची कामे करण्यासाठी उपलब्ध केले जात असत. आपल्या १२ वर्षांच्या संसदीय कार्यकालात बाळासाहेबांनीही एकूण २४ कोटी रुपये अशा प्रकारे उपलब्ध झाले. हा पैसा प्रत्यक्षत: हाती दिला जात नाही. तर त्या ठिकाणच्या कलेक्टरकडून मंजूर कामासाठी त्याचे वितरण होते. कोणालाही व्यैयक्तिक कामासाठी निधीचा उपयोग करता येत नाही.

बाळासाहेब महाराष्ट्राच्या विधान मंडळातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कामासाठी निधीचे वितरण करता येत होते. म्हणूनच जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी मदत केली. सामाजिक उपयोगाच्या कामांचा प्राधान्यक्रम त्यांनी ठरविला होता. या निधीतून मोठ्या प्रमाणावर गरीब वस्त्यांमध्ये शौचालये बांधली गेली. हॅंडपंप बसविणे, बोअरवेल खोदणे, तलावांना संरक्षक भिंती बांधणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधणे, या अगदी छोट्या गावातील – पाड्यातील कामांकडे त्यांनी अधिक लक्ष पुरविले. वनवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा पुरविणाऱ्या आश्रमशाळांचे बांधकाम त्यांना महत्वाचे वाटले. वनवासी विद्यार्थ्यांसाठी राजगुरुनगर मध्ये बांधलेले वसतिगृह, राष्ट्र सेवा समितीचे नांदेड जिल्ह्यातील तरोंडा गावातील छात्रावास, समितीचेच चंद्रपूर येथील वनवासी नक्षलग्रस्त कुटुंबातील विद्यार्थिनींचे वसतिगृह ही काही उदाहरणे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल असलेल्या विशेष आस्थेची निदर्शक आहेत.

बौद्धिक क्षमतांबरोबरच शक्ती आराधना महत्वाची आहे यावर त्यांची श्रद्धा होती. अनेक ठिकाणी व्यायामशाळांची उभारणी, नागपूरच्या प्रहर संस्थेलां केलेली मदत त्याची द्योतक आहे. भारतीय संस्कृतीच्या धारणा वेदाविद्येवर आधारित आहे. वेदपाठशाळांच्या उभारणीत त्यांनी आपला वाट उचलला. अनेक ठिकाणी ग्रंथालये वाचानालये यांना सहाय्य करणे त्यांना महत्वाचे वाटले.

वनवासी कल्याण आश्रमाला दिलेली रुग्णवाहिका, मेळघाटातील चॅरिटेबल हॉस्पिटलचे बांधकाम, महाड (रायगड) च्या रक्तपेढीसाठी रक्तविघटन प्रयोगशाळा, पनवेलच्या डॉ. पटवर्धन रुग्णालयाला दयालीसीस केंद्रासाठी केलेली मदत, ग्रामीण भागात सर्व आरोग्यसुविधा उभारणाऱ्या संस्थाना दिलेला पाठींबा दर्शवितो. मुंबईतील वात्सल्य ट्रस्टच्या अनाथालयासाठीही मदत केली गेली. अनेक ठिकाणी समाज मंदिरे, सांस्कृतिक सभागृहे बांधण्यात त्यांचा हातभार होता.पण अगदी वेगळे काम म्हणजे अनेक ठिकाणी केलेली स्मशान्घातांची निर्मिती. अंत्यसंस्कारसुद्धा नीट करता यावेत यासाठी हा प्रयत्न.

या सर्व कामांची व ती करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सचोटीची पारख करूनच निधीच्या प्रस्तावाला पाठींबा देण्याकडे बाळासाहेबांचा कटाक्ष असे. कामाच्या भूमिपूजनाला जाण्यापेक्षा काम पूर्ण झालेले पाहण्यासाठीच ते जात असत. ‘हा जनतेचा पैसा मी जनतेलाच पोचवतो आहे !’ ही त्यांची भावना ते नेहमीच प्रकट करीत. त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाला अखेरी सर्व उपलब्ध निधीचा उत्तम विनियोग केल्याचे समाधान त्याना होते.